
पुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता. भोर) गावच्या हद्दीमध्ये एका खासगी बसला गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या कडेला उभी करून तत्काळ प्रवाशांना बाहेर काढले, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम डब्ल्यूओएम कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होते. त्याचबरोबर आगीमध्ये जळत असलेल्या बसमध्ये स्फोट होत असल्याने आग आटोक्यात येण्यास उशीर झाला, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.
