जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली. तसेच जखमींनाही ५० हजाराचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.२३) ‘X’ वरून दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे मृतदेह परत आणले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही जबाबदारी काही मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे. एअर इंडिया विमानाने श्रीनगरहून सहा पर्यटकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, श्रीनगरहून सहा पर्यटकांचे पार्थिव आणताना कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळावर समन्वयासाठी उपस्थित राहतील तर मंत्री माधुरी मिसाळ यांना पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना होत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील इतर पर्यटकांना परत आणण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.



