सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन याठिकाणावरून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाणार आहे.
२००१ मध्ये दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंग यांनी मेधा पाटकर न्यायालयात हजर नव्हत्या आणि त्यांनी जाणूनबुजून शिक्षेशी संबंधित आदेशाचे पालन केले नाही, असे म्हटले होते.
न्यायाधीशांनी सांगितले की पाटकर यांचा हेतू स्पष्टपणे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि सुनावणी टाळणे हा होता. शिक्षेवर स्थगिती आदेश नसल्याने, पाटकर यांना हजर करण्यासाठी दबाव आणणे आता आवश्यक झाले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्यावरील अटकेची कारवाई किमान दोन आठवड्यांसाठी स्थगित करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. प्रोबेशन बाँडसंदर्भातदेखील याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. न्यायालयाने मेधा पाटकर यांना मंगळवारी यासंदर्भात सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रोबेशन बाँड सादर करण्यात मेधा पाटकर यांना अपयश आल्यामुळे त्यांच्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.