पुरोगामी किंवा आधुनिक महाराष्ट्रात आजही सुनेचा हुंड्यासाठी, पैशांसाठी छळ होतो… आणि याच छळाला कंटाळून तिला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यातल्या वैष्णवी शशांक हगवणे हिनं सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबानं आपल्या सूनेचा छळ केला, तिला अमानुष मारहाण केली. लेकीचा संसार वाचवण्यासाठी आई-वडिलांनी वेळोवेळी सासरच्यांचा हट्ट पुरवला, हाता-पाया पडून लेकीला पदरात घेण्याची भिक मागितली. पण, सारच्यांना काही मायेचा पाझर कधीच फुटला नाही.
सासू-सासरे, नवरा, दीर, नणंद साऱ्यांनीच मिळून वैष्णवीचा (Vaishnavi Hagawane) वारंवार छळ केला. अखेर वैष्णवीनं स्वतःला संपवलं. राज्यभरात या सर्व प्रकरणावर संतापाची लाट उसळली असून वैष्णवीच्या सासरच्यांना कठोराठ कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. अशातच आता दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केलाय. हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं, प्रॅापर्ट्या पेटवून द्या, असं प्रवीण तरडे म्हणाले आहेत.
प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले?
प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं प्रॅापर्ट्या पेटवून द्या .. कुणा बहिणीचा असा छळ चालू असेल, तर पुढे येऊन बोला… समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दरम्यान, सात दिवसांपासून मोकाट फिरत असलेला वैष्णवीचा नराधम सासरा आणि दीर यांना पोलिसांनी पहाटे बेड्या ठोकल्या. मात्र, अटकेआधी हे दोघे तळेगाव परिसरातच होते, हे उघड झालंय.