मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहिल्याच पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. त्यावर विरोधकांकडून टीका होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षपणे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई उपनगरसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईत रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचं पाणी तुंबले. या मुसळधार पावसानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाच्या परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.
अचानक पावसामुळं यंत्रणांची धावपळ- यावर्षी लवकर पाऊस दाखल झाला. मी पाऊस पडलेल्या ठिकाणचा आढावा घेतला. मुंबईतील अनेक भागात अपेक्षेपेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस पडला. आपली यंत्रणा सतत काम करत आहे. परंतु अचानक पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबले, असं एकनाथ शिंदे म्हणाले. अचानक पाऊस पडल्यामुळे सर्व यंत्रणांची धावपळ उडाली. मुंबईत ढगफुटीसारखा पाऊस पडला, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
पाणी हळूहळू ओसरतंय- अचानक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. परंतु आता मुंबईतील पाणी हळूहळू ओसरत आहे. त्याचा निचरा होत आहे. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मॅनहोलच्या ठिकाणी जिथे पाणी साचते, तिथे पंप मोठ्या प्रमाणात बसविले आहेत. शासन आणि प्रशासन एक टीम म्हणून काम करत आहे. लोकांना दिलासा देण्याचं काम करण्यात येत आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून आणि सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे (नोंद मिलिमीटरमध्ये) आहे.
- नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र -२५२
- ए विभाग कार्यालय -२१६
- महानगरपालिका मुख्यालय -२१४
- कुलाबा उदंचन केंद्र- २०७
- नेत्ररुग्णालयदोन टाकी -२०२
- सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स) -१८०
- मेमनवाडा अग्निशमन केंद्र -१८३
- ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी -१७१
- नारियलवाडी स्कूल, सांताक्रूझ -१०३
- सुपारी टँक, वांद्रे -१०१
- वसाहत, चेंबूर -८२
- एल विभाग कार्यालय, कुर्ला -७६


