
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही अजित पवार यांच्यावर त्यांनी जाहीर टीका केली होती. तसेच जहां नहीं चैना, वहां नहीं रहना असं म्हणत एक प्रकारे अजित पवारांना सूचक इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी अखेर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा राज्यातील राजकीय विषयांवर मोठं भाष्य केलं आहे. खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची? यावर मत व्यक्त करत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींवर छगन भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “मी यावर काही जरी सांगितलं तरी तुम्हाला माहिती आहे की मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे. मात्र, शिवसेनेत काम करणाऱ्या सर्व लोकांवर माझं प्रेम आहे. माझं यावर उत्तर असं आहे की माझं प्रेम बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे. आता एकनाथ शिंदे हे देखील म्हणतात की बाळासाहेबांची शिवसेना, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
- खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची?
खरी राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची की शरद पवारांची असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “आपण हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षाही जास्त काम करतात. अजित पवार सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतात, मी त्यांचं सांगणार नाही. पण शरद पवार आजही काम करतात. मात्र, २०१४ मध्ये काय झालं? दिल्लीतून सांगावा आला की तुम्ही (राष्ट्रवादी) कॉग्रेस सोडा आणि आम्ही (भाजपा) शिवसेना (ठाकरे) सोडतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो”, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
“तेव्हा वेगवेगळे लढायला सांगितलं आणि नंतर तुमचा आम्ही मंत्री म्हणून समावेश करतो असं सांगितलं. मग काय झालं? त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, आम्ही देखील वेगवेगळे लढलो. त्यानंतर दोन महिन्यांत आम्ही जाणार होतो. मात्र, शरद पवार आमच्यासमोर अलिबागमध्ये म्हणाले की मी भाजपाला कायमचा सपोर्ट करणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील घाबरले. त्यानंतर एका उद्योगपतीच्या घरी देखील चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.



