पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गावर संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांकडून स्वागत कक्ष रस्त्यावरच उभारलेले असतात. तेथे दिंडीप्रमुखांचे सत्कार केले जातात. यामुळे पालखीला मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यास मोठा उशीर होतो. त्यामुळे हे स्वागत कक्ष रस्त्यावर असू नयेत, अशी मागणी पालखी सोहळाप्रमुखांकडून करण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि. 26) आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्यासह देहू संस्थानचे पदाधिकारी, संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे पदाधिकारी यांच्यासह अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, तुषार ठोंबरे, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी सातारा, सोलापूरचे प्रशासकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. या वेळी देखणे म्हणाले, पालखी मार्गावरील एक मार्गिका पूर्णपणे वारकर्यांसाठी असावी. तेथून वाहनाला परवानगी देऊ नये. 10 जूनलाच इंद्रायणी नदीत पाणी सोडावे, दिवे घाटात जी दुरुस्ती कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी बॅरिकेड लावावे व पोलिस बंदोबस्त ठेवावा, रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जादा पोलिस नियुक्त करावेत, दिंडीची वाहने सकाळी वारीच्या पुढे जाऊ देणे, जेणेकरून वारकर्यांच्या न्याहारीच्या ठिकाणी ती वेळेवर पोहचतील. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन या वेळी द्विवेदी यांनी दिले.
आगामी आषाढी एकादशी पालखी यात्रा सोहळ्यासाठी शासकीय अधिकार्यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकर्यांसाठी आरोग्य व्यवस्था, औषधसाठा आदींची उत्कृष्ट व्यवस्था करावी; तसेच पालखी सोहळाप्रमुख आणि पदाधिकार्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने करावीत, अशा सूचना पुणे महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्या.
विधानभवन येथे आयोजित आषाढी एकादशी पालखी यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी तसेच विविध पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली.