पुणे : Pune Crime News | मुलाला घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुनेने बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचे खोटे सांगून ज्येष्ठ नागरिकांला ६ लाख रुपयांना लुबाडल्यानंतर आणखी १५ हजार रुपये घेताना लोणी काळभोर पोलिसांनी तोतया महिला वकिलाला रंगेहाथ पकडले.
स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा़ लोणी काळभोर) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यामधील स्नेहल कांबळे हिच्या कार्यालयात २४ एप्रिल २०२५ पासून २९ मे दरम्यान घडला आहे. स्नेहल कांबळे हिने ग्रामपंचायतीच्या गाळ्यात कार्यालय थाटले असून वकिल नसतानाही आपण वकिल असल्याचे भासवून तिने अनेकांना अशाच प्रकारे फसविल्याचे समजते. पोलिसांकडून तिची कार्यालय व घरझडती करण्यात येत आहेत. याबाबत अहिल्यानगर येथील शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथील एका ६२ वर्षाच्या शेतकर्याने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अशिक्षित असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन स्नेहल कांबळे हिने त्यांना वकील असल्याचे खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली. तिने फिर्यादी यांना कोर्टात त्यांच्या सुनेपासून सोडचिठ्ठी घेऊन देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व बँक खात्यावर पैसे घेतले. सोडचिठ्ठी करुन न देता त्यांची आर्थिक फसवणुक केली. स्नेहल कांबळे हिने फिर्यादी यांना त्यांचे विरुद्ध सुनेने बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, असे खोटे कारण सांगितले. त्यातून सोडवुन देण्याकरीता पोलीस व कोर्ट कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील. नाही तर तुम्हाला अटक होईल, अशी भिती दाखवून त्यांच्याकडून आतापर्यंत ५ लाख ९४ हजार ६० रुपये खंडणी स्वरुपात स्वीकारले. स्नेहल कांबळे आणखी पैसे मागत होती. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला. फिर्यादी हे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना २७ मे रोजी कार्यालयात भेटले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. डॉ. राजकुमार शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिसांना याची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, फिर्यादी यांच्याकडून १५ हजार रुपये घेताना स्नेहल कांबळे हिला रंगेहाथ पकडले.




