रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आयपीएल विजेतेपद मिळवल्यानंतर कर्नाटकमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. हाच जल्लोष साजरा करण्यासाठी आणि आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बुधवारी ५ जून रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा आपला जीव गमवावा लागला, तर ३३ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर राजकीय, तसेच क्रीडा विश्वातूनही हळहळ व्यक्त होत असताना मृतांना नेण्यात आलेल्या रुग्णालयांत विदारक दृश्यं दिसत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

चेंगराचेंगरीतील मृत व जखमींना नेण्यात आलेलं बंगळुरूतलं एक रुग्णालय म्हणजे बॉवरिंग हॉस्पिटल. बुधवारी रात्री रुग्णालयाच्या शवागाराबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी फोडलेला टाहो तिथे असणाऱ्या प्रत्येकाचंच काळीज पिळवटून टाकत होता. या चेंगराचेंगरीत मनोज कुमार नावाचा एक १८ वर्षांचा महाविद्यालयीन तरुण मृत्यूमुखी पडला. मनोजचे वडील पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करतात. “त्याला कॉलेजमध्ये जायला मिळावं म्हणून मी त्याला दुकानावर प्लेट धुवायलाही सांगत नव्हतो. मी जिवाचं रान करून त्याला वाढवलं. पण आता तो निघून गेला आहे”, असं सांगताना मनोजच्या वडिलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.

मनोज कुमार प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या बालपणीच्या तीन मित्रांसोबत तो स्टेडियमवर आपल्या विजेत्या संघाला पाहायला गेला होता. “मनोजनंच आम्हाला स्टेडियमवर जाण्याचा आग्रह केला”, असं त्याचा मित्र सात्विक सांगत होता.

bengaluru stampede

“आरसीबीच्या जर्सीतच माझ्या मुलाचा मृत्यू झाला”

वैदेही रुग्णालयातलं चित्रही फारसं वेगळं नव्हतं. तिथे शवागाराबाहेर एक आई आपल्या अवघ्या २२ वर्षांच्या तरुण मुलाच्या मृत्यूवर आसवं गाळत होती. प्रज्वल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. “तो आरसीबीचा प्रचंड मोठा चाहता होता. आरसीबीच्याच जर्सीमध्ये त्याचा मृत्यू झाला. आरसीबीनं विजेतेपद पटकावलं तेव्हा त्या सगळ्यांनी नाचून आनंद साजरा केला. पण आता तो कायमचा निघून गेला आहे. आरसीबी माझा मुलगा परत करू शकणार आहे का?” असा मन हेलावून टाकणारा सवाल ही आई करत होती.

एमडी हुसेन नावाच्या तरुणानं केली मदत

प्रत्यक्ष चेंगराचेंगरीची घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या एम. डी. हुसेन नावाच्या २४ वर्षीय तरुणानं अनेकांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. हुसेन सांगतो, “जवळपास ३.३५ च्या सुमारास तासाभरापासून गेट क्रमांक २० जवळ वाट पाहात असणारी गर्दी बेभान झाली. ते गेट फक्त तपासणीसाठी काहीसं उघडलं जाताच एक मोठा लोंढा आत जाण्यासाठी ढकलाढकली करू लागला. त्यावेळी तिथे फक्त तीन पोलीस कर्मचारी आणि स्टेडियमचे काही सुरक्षारक्षक होते”.