मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव अदानी आणि सरकारने आखल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी धारावी पुनर्विकासाविरोधात लढा उभारण्याचा, आंदोलन करण्याचा निर्णय घेत आता ठाकरे गट मैदानात उतरला आहे. मुलुंड येथे सोमवारी ठाकरे गटाकडून एका सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आमदार आदित्य ठाकरे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी लाटल्या जात असून या प्रकल्पात काय त्रुटी आहेत, या प्रकल्पाचा काय परिणाम होणार यासंबंधीचे एक सादरीकरण ते यावेळी करणार आहेत. या सभेत धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

राज्य सरकारने धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला असून पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. तर या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला देण्यात आले आहे. अदानी समुहाला धारावीकरांचा विरोध असताना, ५०० चौरस फुटांसह अन्य मागण्या मार्गी लागण्यात आलेल्या नसतानाही हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप धारावीकर करीत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचेही धारावीबाहेर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेत सरकार अदानी समुहाला मुंबईतील विविध ठिकाणची अंदाजे १२०० एकर जागा देणार आहे.