मुंबई : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र तलावक्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत अवघा ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
शिल्लक साठा व पावसाचा आंदाज घेत यावर्षी मुंबई महापालिकेने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातील पाणीपातळी घटल्यामुळे राखीव पाणी साठ्यातून मुंबईत पाणी आणण्यात येणार आहे. यातून मुंबईकरांची तहान भागणार असली तरी फार काळ राखीव कोट्यातील पाणीसाठा वापरणे शक्य नाही. येणाऱ्या आठवड्याभरात तलाव क्षेत्रात पाऊस दाखल झाला तर ठीक अन्यथा सध्याचा पाणीसाठा अजून अजून महिनाभर पुरवण्यासाठी महापालिकेसमोर पाणी कपात करण्याशिवाय दुसरा पर्याय राहीलेला नाही.
तलावातील पाणीसाठ्याचा १३ जूनला घेतलेल्या आढाव्यात ९ टक्के म्हणजे एक लाख तेहतीस हजार दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक असल्याचे दिसून आले. हे पाणी कोणतीही कपात न करता येणाऱ्या काळात पुरवणे शक्य नाही. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नाही. तोपर्यंत असलेले पाणी पुरवणे आवश्यक असल्याचे मत पालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने व्यक्त केले. मुंबईकरांना कमीत कमी पाणीटंचाई भासावी यासाठी सुरुवातीला १० ते १५ टक्के पाणी कपात करून दररोज ४०० ते ४५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.


