अमरावती : शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत समिती नेमली जाईल. त्यानंतर या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ. तसेच दिव्यांगाच्या मागणीसाठी मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी राज्य सरकारच्या वतीने प्रहारचे संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिले.
सरकारचा निरोप घेऊन मंत्री उदय सामंत यांनी आज अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेल्या बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी सामंत यांनी शासनाचे अधिकृत पत्र बच्चू कडू यांना वाचून दाखवले. त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे विनंती सामंत यांनी केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी, आंदोलन पुढे ढकलत असल्याचे सांगत फळांचा रस पिऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारला कर्जमाफीसाठी २ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली. २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
सक्तीची वसुली कराल तर झाडाला बांधून ठोकू- बच्चू कडू
अख्खा महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एकवटला आहे, हे आंदोलनाचे यश असल्याचे बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी बोलताना सांगितले. सक्तीची वसुली कराल तर झाडाला बांधून ठोकू. आठ दिवसांत सक्तीची वसुली थांबवावी, असा इशारा त्यांनी दिला. सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. एक मंत्री बोलायला तयार नाही. मागण्या मान्य करा. शेतकरी कष्टीची लढाई लढणं फार कठीण असते. आपण ४ आंदोलने केली. हे पाचवं आंदोलन आहे, असेही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू हे गुरुकुंज मोझरी येथे मागील ८ जूनपासून शेतकरी, दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन अन्नत्याग आंदोलन करत होते.
सरकारकडून बच्चू कडू यांना देण्यात आलेले पत्र
- शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
- दिव्यांगाच्या मानधनवाढीबाबत ३० जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल.
- उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे पत्र जारी केले आहे.



