नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना रविवारी (15 जून) रात्री दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जरीमधील तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या महितीनुसार, सोनिया रात्री 9:10 वाजता रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. यानंतर त्यांना दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सोनिया गांधी यांना काय झालं? : 7 जून रोजी शिमला येथे असताना सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली होती. तेव्हा त्यांना शिमला येथीलच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 78 वर्षीय सोनिया गांधी यांना यापूर्वीही अनेकवेळा सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावर्षीच 20 फेब्रुवारी रोजीदेखील पोटाच्या त्रासामुळे त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.