लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर (अमौसी विमानतळ) आज (दि.१६) सकाळी एक मोठी दुर्घटना होता होता टळली. सौदी अरेबियन एअरलाइन्सच्या विमानाला लँडिंगनंतर टॅक्सी-वे वर जात असताना त्याच्या डाव्या चाकातून ठिणग्या आणि धुराचे लोट निघू लागले. हे विमान जेद्दाहून २८२ हज यात्रेकरूंना घेऊन परतले होते. प्रसंगावधान राखत पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती दिली, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियन एअरलाइन्सचे विमान एसव्ही ३८५२ शनिवारी रात्री जेद्दा विमानतळावरून लखनऊसाठी निघाले होते. या विमानात २८२ हज यात्रेकरू प्रवास करत होते. रविवारी (दि.१५) सकाळी सुमारे ६:३० वाजता विमान अमौसी विमानतळावर उतरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रन-वेवर यशस्वी लँडिंगनंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. ही बाब लक्षात येताच पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) याची सूचना दिली.
घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने फोम आणि पाण्याचा मारा करून केवळ २० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाला पुश बॅक करून टॅक्सी-वेवर आणण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हायड्रॉलिक सिस्टीममधील लिकेजमुळे विमानात बिघाड
प्रवाशांना सुखरूप उतरवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने विमानाच्या चाकातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिंग दरम्यानच डाव्या बाजूच्या चाकात बिघाड झाला होता. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये लिकेज झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या होत्या.
विमान जेद्दासाठी रिकामेच परतणार
विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि अभियंत्यांचे पथक तो दुरुस्त करत आहे. हज यात्रेकरूंच्या वापसी दरम्यान सौदी अरेबियन एअरलाइन्सचे विमान जेद्दाहून प्रवाशांना घेऊन लखनऊला येते आणि येथून ते रिकामेच परत जाणार आहे. विमानातील बिघाड दुरुस्त होताच ते जेद्दासाठी रवाना केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.