मुंबई/पुणे, १६ जून — राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पर्यटनस्थळी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रविवारी घराबाहेर पडले. मात्र या सुट्टीच्या दिवशी राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनी अनेक कुटुंबांवर शोककळा पसरवली. पुणे जिल्ह्यातील कुंडमळा, नांदेड जिल्ह्यातील बासर, तसेच माथेरान येथे घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूण नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- कुंडमळा येथे पूल दुर्घटना – चार जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे काल (रविवार) सकाळी एका पुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. शासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या दुर्घटनेत चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बासर येथे गोदावरी नदीत बुडून मृत्यू
धर्माबादपासून काही अंतरावर असलेल्या बासर येथे गोदावरी नदीपात्रात फिरायला गेलेल्या काही नागरिकांचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
- माथेरानमध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
मुंबईतील तीन महाविद्यालयीन विद्यार्थी माथेरान येथे तलावाजवळ फिरत असताना पाण्यात बुडाले. मद्यप्राशन व असावधपणामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुट्टीचा दिवस आणि पावसाळी वातावरण यामुळे अनेक तरुण फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शासनाचा इशारा – पावसाळ्यात पर्यटनस्थळी खबरदारी घ्या
सुट्टीच्या दिवशी आणि पावसाळी हवामानात अशा दुर्घटनांची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी नदी, धबधबा, समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे, मद्यप्राशन करून पोहणे अथवा धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, रील्स बनवणे टाळावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः ओले, शेवायुक्त खडक, चिखलयुक्त रस्ते व दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे लहान मुलांसह सर्वांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.



