मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यात सामना पाहायला मिळणार असं चित्र आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंना देण्यात आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलीय.
दरम्यान, शुक्रवारी श्रीकांत शिंदे मुंबई महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेसाठी ‘लढा आपल्या मुंबईचा’ ही मोहीम सुरू केली आहे. अधिकृत घोषणा केली नसली तरी आदित्य ठाकरेच मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं नेतृत्व करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचा सामना ठरलाय असं म्हणायला हरकत नाही. आता सामनावीर कोण होतंय हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. या निवडणुका शिवसेना पक्ष श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहे अशी माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय श्रीकांत शिंदे घेणार आहेत.
शिंदेसेनेत शाखाप्रमुखांसह अनेक बदल
मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून घ्यायची असा चंग एकनाथ शिंदे यांनी बांधला आहे. त्यासाठी शाखाप्रमुखांसह सर्व ठिकाणी बदल केले जात आहेत. ही निवडणूक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचं दिसून येतंय. वर्धापनदिनाच्या तयारीसंदर्भात त्यांनी वरळी येथे महत्त्वाची बैठक घेतली. त्याच्या आधी मनसेच्या नेत्यांनीही खासदार श्रीकांत शिंदे यांचीच भेट घेतली होती.
मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे. शिवसेना फुटल्यानंतर आता मुंबईमध्ये कुणाची ताकद जास्त हे दाखवण्याची संधी दोन्ही गटांना आहे. ठाकरे गटाचे नेतृत्व हे आदित्य ठाकरे करणार आहेत. त्यामुळेच ही लढाई आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशीच असणार आहे.
निवडणुकांसाठी शिंदेसेनेच्या जबाबदाऱ्या ठरल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंनी चांगलीच कंबर कसली आहे. निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची वाट न पाहता, त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केलं. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकरांवर असेल. उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांच्यावर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणाची जबाबदारी असेल. मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल. तर विदर्भ फत्ते करण्यासाठी संजय राठोड आणि आशिष जैस्वाल यांना काम करावं लागणार आहे.