केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 18 जून रोजी खासगी वाहनांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की देशभरातील कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी वाहनांसाठी आता Annual FASTag Pass उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे टोल प्लाझावर पुन्हा पुन्हा टोल भरण्याची अडचण दूर होणार असून, प्रवास अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.
हा पास 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे. त्यासाठी ग्राहकांना 3000 रुपये इतकी एकदाच रक्कम भरावी लागेल. एकदा सक्रिय झाल्यानंतर हा पास एक वर्ष किंवा 200 ट्रिप्सपर्यंत वैध असेल – यापैकी जी अट आधी पूर्ण होईल, ती लागू राहील. यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
वार्षिक पासचा फायदा कुणाला? :
गडकरींनी स्पष्ट केले की, हा पास फक्त खासगी वाहनांसाठी असणार आहे आणि याचा प्रवासी व कारचालकांनाच लाभ मिळणार आहे. जे नागरिक टोल प्लाझाच्या 60 किमी परिसरात राहतात, त्यांच्यासाठी तर ही योजना अधिक फायदेशीर आहे. सध्या मासिक टोल पास 340 रुपये दरमहा (वार्षिक 4,080 रुपये) दराने उपलब्ध आहे, पण नवीन वार्षिक पास केवळ 3000 रुपयात मिळणार आहे.
तसेच, वाहनधारक Rajmarg Yatra App, NHAI च्या वेबसाइट किंवा MoRTH च्या पोर्टलवरून सहज पास अॅक्टिव्हेट किंवा नूतनीकरण करू शकतील. यामुळे डिजिटल व्यवहाराला चालना मिळणार असून, नागरिकांना वेगाने आणि अडथळाविना प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
सरकारचा उद्देश आणि टोल उत्पन्न :
गडकरी यांनी सांगितले की या उपक्रमाचा उद्देश टोल प्लाझांवरील गर्दी कमी करणे, वादविवाद थांबवणे आणि प्रवास अधिक कार्यक्षम बनवणे हाच आहे. यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन मिळेल आणि राष्ट्रीय महामार्ग अधिक आधुनिक आणि सुलभ होतील. (Annual FASTag Pass)
2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 55,000 कोटी रुपयांच्या टोलमधून फक्त 8,000 कोटी रुपये खासगी वाहनांकडून मिळाले होते. विशेष म्हणजे, टोल प्लाझावरून जाणाऱ्या 53% गाड्या खासगी असूनही, केवळ 21% उत्पन्नच त्यांच्याकडून मिळते. त्यामुळे सरकारने खासगी वाहनांसाठी एक सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे.