मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील 2000 जुन्या बसेस आता भंगारात काढण्यात येणार असून, या बसेसचा लिलाव धातू भंगार व्यापार महामंडळाच्या (एमएसटीसी) माध्यमातून केला जाणार आहे. सध्या या बसेस राज्यातील 32 आगारांमध्ये उभ्या असून, त्या मुंबईत उच्च बोलीदाराला विकल्या जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एसटी महामंडळाकडे सध्या सुमारे 14 हजार बसांचा ताफा आहे. त्यापैकी वयोमर्यादा ओलांडलेल्या जुन्या बस हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी सरासरी 2000 बस भंगारात टाकल्या जात असून, येत्या दोन ते तीन वर्षांत सुमारे 5000 बस भंगारात जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या लिलावांमध्ये प्रत्येकी बस 2 ते 2.5 लाख रुपयांना विकली गेली होती, ज्यामुळे महामंडळाला चांगला महसूल मिळाला होता.
परंतु यंदाच्या लिलावात काही बदल करण्यात आले आहेत. राज्य परिवहन विभागाने सर्व सार्वजनिक प्रवासी वाहतूक महामंडळांना लिलावासाठी केवळ महाराष्ट्रातील बोलीदारांना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया देशभरातील बोलीदारांसाठी खुली होती. आता लिलावावर आलेल्या या मर्यादेमुळे स्पर्धा कमी होण्याची शक्यता असून, राज्यात केवळ दोनच मोठे भंगार व्यापारी असल्यामुळे एसटीच्या जुन्या बसना अपेक्षित दर मिळेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळाला भंगार विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात खुल्या आणि पारदर्शक लिलाव प्रक्रियेसाठी नवीन दिशा विचारात घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.



