![]()
सातारा : पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी 2025 पालखी सोहळा गुरूवारी सातारा जिल्ह्यात दाखल झाला. पाडेगाव इथं सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात स्वागत करुन दत्त मंदिर घाटावर माऊलींच्या पादुकांना पहिलं शाही स्नान घालण्यात आलं. यावेळी नदीपात्रात बुडताना तीन जणांना रेस्क्यू टीमसह एनडीआरएफच्या जवानांनी वाचवलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली.

पाडेगाव याठिकाणी नीरा नदीमध्ये बुडणाऱ्या तीन जणांचे जीव वाचविण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफ जवानांना यश आलं. त्यामुळं यापुढं वारकरी बांधवांनी सतर्कता बाळगावी. धरणातून पाणी सोडल्यानं पाण्याच्या प्रवाहात जाणं टाळावं. –सुनील भाटिया, संस्थापक, महाबळेश्वर ट्रेकर्स

माऊलींना शाही स्नान व पाद्य पूजा : माऊलींच्या पादुकांना शाही स्नान, चंदन उटी व तुळशीहार अर्पण करून पाद्य पूजन केल्यानंतर सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. पुढील चार दिवस माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्हा हद्दीत मुक्कामी असणार आहे. या काळात सातारा जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतात.
पोलीस बँड पथकाकडून स्वागत : माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सातारा जिल्हा हद्दीत आगमन झाल्यानंतर पोलीस बँड पथकानं धून वाजवत स्वागत केलं. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे देखील स्वागताला उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी अत्यावश्यक सुविधा : माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वारीच्या मार्गावरील अनेक गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्काची वारकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. प्रशासनानं पाण्याचे टँकर, आरोग्य सेवाही उपलब्ध करुन दिली आहे. तसंच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



