कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय राजकारणात सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकत्र येण्यावर चर्चा केली जात असतानाच शरद पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावरती भाष्य केले आहे.
दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळे चांगले काम केले, तर कधीही चांगलेच आहे. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले, तर वाईट वाटायचे कारण नाही, असे विधान शरद पवार यांनी पुन्हा एकदा केले आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राजकीय भूवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतणे पुन्हा एकत्र दिसतील का? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.



