मुंबई : ”हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे, त्यामुळे हिंदी लादण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात सध्या हिंदी सक्ती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून याच मुद्द्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर देखील हिंदीची सक्ती नको असे म्हणाल्या, अनेकांचे हेच मत आहे. पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या तर ते कठीण होईल, आमचा हिंदीला विरोध नाहीये, मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेल्या ३० वर्षापासून अध्यक्ष आहे. रविवारी मुंबईत हिंदी सभा व्हायची, तेव्हा फुकट शिकायला मिळायचे, आम्ही जरी मराठी भाषेत शिकलो असलो, तरी आजकाल हिंदी सर्वांना येत आहे. लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणे योग्य नाही, अंदरसुल शाळेत मुली जापनीज भाषेत बोलत होत्या, पण त्या मराठी शाळेत शिकत आहेत.
आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हिंदीबाबत अंतिम निर्णय घेऊ, पावसाळी अधिवेशनात खूप प्रश्न आहेत, शेती, अवकाळी पाऊस, शिक्षण, रस्ते असे शेकडो प्रश्न आहेत. हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत. मंत्री दादा भुसे हिंदी प्रश्नावर राज ठाकरे यांना जसे भेटले, तसेच अनेक नेत्यांना देखील जाऊन भेटत आहेत, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.



