मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. विरोधकांनी संपूर्ण दिवसभरातील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्ज यावरून सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेत प्रश्नोत्तरांनंतर विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाल्यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.
नाना पटोलेंचं एका दिवसांसाठी निलंबन- मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, यावर विरोधक ठाम राहिले. “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाणं हे योग्य नाही. त्यामुळं नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी,” अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, विरोधकांची आणि नाना पटोले यांची घोषणाबाजी आणि त्यांचे वर्तन यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंचे एका दिवसासाठी निलंबन केले. यानंतर विरोधकांनी अधिक आक्रमक होत घोषणाबाजी केली. या सरकारचं करायचे काय? खाली डोकं वर पाय…माफी मागा…माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा…अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.
कशामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांची माफी मागण्याची केली मागणी?भाजपा आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. शेतकऱ्यांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची नाना पटोले यांनी मागणी केली. जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार लोणीकर यांनी म्हटलं होतं की, लोकांना कपडे, बूट, मोबाईल, योजनांचे आर्थिक फायदे आणि पेरणीसाठी पैसे सरकारमुळे मिळत आहेत. तर कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांनी लग्नात खर्च केल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर भिकारीदेखील रुपया घेत नाही, पण त्याच रकमेत सरकार पीकविमा देत असल्याचं वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केलं होतं. मात्र, काही लोक पीकविम्याचा गैरवापर करत असल्याचंही कृषीमंत्र्यांनी म्हटलं होतं.



