मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे सत्कार
पंढरपूर | प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल महापूजा संपन्न झाली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
या वर्षीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “वारीची परंपरा सातत्याने वाढत असून, यंदा वारीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. “दिंड्यांसोबतच मोठ्या प्रमाणात तरुण वारकरी पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले आहेत,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘निर्मल वारी’ उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “स्वच्छता, हरित आणि पर्यावरणपूरक वारी यंदा अनुभवायला मिळाली. कुठेही अस्वच्छता दिसून आली नाही. संतांच्या स्वच्छतेच्या संदेशाचा खरा अर्थ या वारीमध्ये उमगतो,” असे ते म्हणाले. “राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सत्कार सोहळ्यात आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण वारीच्या व्यवस्थेसाठी शासन आणि प्रशासनाने उत्कृष्ट सुविधा पुरवल्या असून, वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कसूर ठेवली नाही, असे समाधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.



