
पाथर्डी: केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांनी एकत्र येत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी भूमिका घेतली. त्याबद्दल शहरात उबाठा शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शनिवारी सकाळी नाईक चौकात शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. तालुका प्रमुख भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फटाके फोडून, मराठी घोषणांनी परिसर दणाणून टाकत आनंदोत्सव साजरा केला .उद्धव… राजा… साहेब यांचा विजय असो, मराठीचा जयजयकार असो, मराठी माणूस झुकणार नाही अशा दमदार घोषणांनी संपूर्ण चौक दुमदुमून गेला.
यावेळी नवनाथ चव्हाण, रामकिसन भिसे, नंदकुमार डाळिंबकर, सचिन नागपुरे, अंकुश आव्हाड, फुलचंद चिमटे, गौतम वाघ, किशोर गाडेकर, बबन शेळके, विकास दिनकर, नवनाथ उगलमुगले, विष्णू शिरसाट, पांडुरंग सकुंडे उपस्थित होते.
यावेळी दराडे म्हणाले, ही एकता केवळ राजकीय नाही, ती भावनिक आणि भाषिक अस्मितेची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे म्हणजे मराठी जनतेचा पुन्हा आत्मविश्वास उंचावणे आहे. हिंदी सक्तीला विरोध हा केवळ आंदोलनाचा मुद्दा नसून, तो आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. आजचा जल्लोष हे त्याचे प्रतीक आहे. दोन्ही बंधू एक आलेल्या सत्ताधारी भाजपला भीती वाटत असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



