
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीआधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी लाभदायक ठरत असली तरी या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या प्रचंड निधीमुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडत असल्याची जाहीर कबुली सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनीच दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटाती नेते तथा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
यावरून शिवसेनेने (ठाकरे) सरकारला टोला लगावला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटलं आहे की “लाडकी बहीण’ योजना राज्यातील भगिनी वर्गासाठी लाभदायक ठरली आहे, हे खरे असले तरी सरकारसाठी ‘गले की हड्डी’ बनली आहे. राज्यकर्ती मंडळी कितीही नाकारत असली तरी हेच सत्य आहे. हेच सत्य नाराजीच्या स्वरूपात मंत्र्यांच्या तोंडून जाहीरपणे बाहेर पडू लागले आहे आणि सरकारला तोंडावर आपटत आहे.
स्वतः अजित पवारांनी देखील ‘लाडकी बहीण’ योजनेत चूक झाल्याचे मान्य केले होते. परंतु, ही ‘चूक’ दरमहा सहन करावी लागत असल्याने राज्याचे आणि वेगवेगळ्या खात्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. भरणे यांच्या या वेदनेवर अजित पवार आता कोणती गोळी देऊन फुंकर घालतात हे दिसेलच, पण बहिणींसाठी लाडकी ठरलेली ही योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी मात्र दोडकी ठरू लागली आहे हे नक्की.”



