
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षाची निवड व्हायच्या आधीच काँग्रेस-महायुतीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच बँकेचे नव्याने निवडून आलेले संचालक रवींद्र शिंदे यांनी आज भाजपात प्रवेश केला. ही घडामोड बघता भाजप महायुतीने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार निवडला असल्याचे बोलले जात आहे.
रवींद्र शिंदे हे बँकेचे यापूर्वी एक वर्षांसाठी अध्यक्ष होते. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 संचालक निवडून आले आहेत. महायुती तसेच काँग्रेस आघाडीच्यावतीने आपलेच सर्वाधिक संचालक निवडून आले असून अध्यक्ष आमचाच राहील असा दावा केला आहे. मात्र महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे सेनेच्या जिल्हाध्यक्षाने भाजप प्रवेश केल्याने आघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जाते.
बँकेच्या नव्या अध्यक्षांबाबत कमालीची उत्सुकता तानली जात आहे. जुलै महिन्याच्या २९ तारखेला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. एकूणच राजकीय घडामोडी बघता बँकेवर भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या विश्वासातील व्यक्तीच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील होतील, अशी माहिती आहे निवडणुकीच्या सुरुवातीपासून बंटी भांगडिया यांनी रवींद्र शिंदे यांना हाताशी धरून फेकलेल्या राजकीय जाळ्यात काँग्रेसचे दिग्गज नेते सहज अडकल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही खेळी आमदार भांगडिया यांनी अतिशय संयमाने बुद्धी कौशल्याने राजकीय जाणीवेतून लढल्याची माहिती आता पुढे येत आहे. महत्त्वाची भूमिका बजावलेले रवींद्र शिंदे बँकेचा नवा अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून संजय डोंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची आतील गोटातील माहिती आहे. रविंद्र शिंदे यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केल्याने भाजपचा जिल्हा बँकेवर पहिल्यांदा ताबा मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



