मुंबई | प्रतिनिधी
मुंबईत आज ‘WAVES 2025’ या बहुचर्चित परिषदेद्वारे भारताच्या क्रिएटिव्ह युगाचा नवा अध्याय अधिकृतपणे सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या कार्यक्रमात ‘WAVES 2025 निष्कर्ष अहवाल’ प्रकाशित करण्यात आला. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) आणि NFDC कॅम्पसच्या उद्घाटनाने देशाच्या क्रिएटिव्ह इकोसिस्टिमला नवसंजीवनी मिळाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
मुंबई — ‘एंटरटेनमेंट कॅपिटल’ ते ‘क्रिएटिव्ह सुपरपॉवर’
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई ही देशाची ‘एंटरटेनमेंट कॅपिटल’ असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीला दिशा याच शहरातून दिली होती. त्या दृष्टिकोनाला आज मूर्त स्वरूप मिळत आहे.”
‘WAVES परिषद’ ही केवळ एक कार्यक्रम न राहता, “एक व्यापक चळवळ” ठरली असल्याचे सांगत त्यांनी ‘WAVES INDEX’ मध्ये झालेल्या वाढीकडे लक्ष वेधले. केवळ काही महिन्यांपूर्वी ₹93,000 कोटी असलेला हा इंडेक्स आता ₹1 लाख कोटींवर पोहोचला असून, भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या झपाट्याने होणाऱ्या विस्ताराचे हे ठळक उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
₹150 कोटींचा विशेष निधी; दरवर्षी WAVES परिषद
मुख्यमंत्र्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे ₹150 कोटींचा विशेष निधी मंजूर केल्याची घोषणा केली. तसेच ही परिषद दरवर्षी अथवा दोन वर्षांनी मुंबईतच भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “पुढील WAVES परिषद ही याहून दहा पट अधिक व्यापक आणि जागतिक स्तरावर प्रभावी असेल,” असे ते म्हणाले.
IICT – केवळ संस्था नाही, प्रेरणास्थान
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “ही संस्था केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता, एक ‘आयकॉनिक डेस्टिनेशन’ ठरेल.”
जगभरातून विद्यार्थी केवळ शिक्षणासाठीच नव्हे, तर प्रेरणा घेण्यासाठी इथे येतील आणि ही संस्था क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या भविष्यासाठी एक केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत पॅव्हेलियनला नव्या ठिकाणी स्थान
या कार्यक्रमात ‘भारत पॅव्हेलियन’च्या नव्या आकर्षणाचे उद्घाटनही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, हे पॅव्हेलियन आता ‘गुलशन’ इमारतीत स्थलांतरित करण्यात आले असून, हे मुंबईच्या पर्यटन नकाशावर एक नवे आकर्षण ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी केंद्रीय आयटी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मंत्री ॲड. आशिष शेलार, NFDC आणि IICT चे वरिष्ठ अधिकारी तसेच क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.