बीड : बीड जिल्ह्यातील एक दुर्गम आणि दुर्लक्षित गाव आहे धुनकवाड. या गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा प्रवास म्हणजे एक धाडसाची कहाणीच आहे. घनदाट जंगल, पाण्याने भरलेले कच्चे रस्ते, चिखलामधून वाट काढत आणि अनेक वेळा डोंगर उतारांवरून जिवाच्या आकांताने खाली उतरत ही मुले दररोज शाळेकडे वाटचाल करतात.
पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्तेच नाहीत, जे आहेत ते चिखलाने भरून गेलेले. ओढ्यांमध्ये पाणी साचलेले असते. अनेक वेळा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कमरेपर्यंत पाण्यातून वाट काढावी लागते. या प्रवासात घसरून पडणे, जखमी होणे, साप- विंचवांचा धोका हे सगळे सामान्य झाले आहे.
शिक्षणाची आस, धोका विसरून
जगण्याच्या प्राथमिक गरजा पुरवणं अजूनही अनेक गावांत कठीण आहे. मात्र धुनकवाडमधील विद्यार्थी शिक्षणासाठीचा संघर्ष जिद्दीने करत आहेत. दररोजचा हा जीवघेणा प्रवास त्यांच्या शिक्षणाची आस दर्शवतो. गावात माध्यमिक शाळा नसल्यामुळे ५-७ किलोमीटर लांब असलेल्या शेजारच्या गावात जावं लागतं. हीच परिस्थिती अनेक वर्षांपासून सुरू आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष?
गावकऱ्यांनी अनेकदा रस्त्यांची मागणी केली. स्थानिक पातळीवर निवेदनंही देण्यात आली, पण अद्यापही पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत. धुनकवाडच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ शिक्षणप्रवेश सुनिश्चित करण्यासाठी रस्ता बांधणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा उद्याचं भविष्य असलेली ही मुले रोजच्या धोक्यातून जावी लागते, याला जबाबदार कोण?
सरकार आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज
धुनकवाडसारख्या गावांमध्ये शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळेत जाणे ही गोष्ट शिक्षणाच्या हक्कावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. प्रशासनाने तातडीने पावसाळ्यानंतर रस्ते सुधारण्याची, पुलांची व्यवस्था करण्याची आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याची गरज आहे.



