मुंबई | २० जुलै २०२५
मुंबई लोकल रेल्वेतील महिला डब्यात सोमवारी एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली. सीटच्या वादातून सुरू झालेली भांडणाची ठिणगी थेट मराठी विरुद्ध हिंदी भाषावादात भडकली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, #मुंबईलोकल, #भाषावाद आणि #मराठीहक्क हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत.
काय घडलं नेमकं?
प्रत्येक दिवशीप्रमाणे महिलांचा लोकलमधील प्रवास सुरू असतानाच एका सीटवरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी एका मराठी महिलेनं स्पष्ट शब्दांत सांगितलं मुंबईत राहायचं असेल तर मराठीत बोला, नाहीतर बाहेर जा! यावर अमराठी, हिंदीभाषिक महिलेनं अर्वाच्य भाषेत प्रत्युत्तर दिलं आणि प्रकरण चिघळलं. प्रवाशांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघी महिला एकमेकींवर जोरजोरात ओरडत राहिल्या. काही वेळात हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि त्यानंतर हे प्रकरण पेट घेत गेलं.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
मुंबई ही मराठ्यांची आहे. इथं राहायचं असेल तर मराठीचा आदर करा.
तर दुसरीकडे, हिंदी भाषिक वापरकर्ते या वक्तव्याला ‘भेदभाव’ आणि ‘वांशिक तिरस्कार’ म्हणून टीका करत आहेत.
मुंबई ही सर्वांची आहे, भाषा जबरदस्तीने लादता येत नाही असे मत अनेक अमराठी युजर्सनी मांडले आहे.
स्थानक व रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया
या घटनेबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र महिला डब्यांमध्ये वारंवार होणाऱ्या सीट वादांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही प्रत्यक्ष हालचाल होईपर्यंत वाद विकोपाला जातो.
भाषा आणि ओळख यांचा संघर्ष?
या घटनेने पुन्हा एकदा ‘मुंबईतील मराठी अस्तित्व’ हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे स्थानिक भाषेला महत्त्व द्यावे अशी मागणी आहे, तर दुसरीकडे अनेकजण ‘सर्व भाषांना समान वागणूक’ दिली पाहिजे, असे म्हणत आहेत.
लोकल ट्रेनमध्ये केवळ प्रवास नाही, तर विविध समाजघटकांचे सहजीवन दिसते. अशा ठिकाणी भाषेवरून होणारे वाद केवळ भांडण नसून ते सामाजिक सलोख्यावर होणारा घाला ठरू शकतात. मुंबईसारख्या महानगरात सहिष्णुता, समजूत आणि परस्पर आदर यांची नितांत गरज आहे, मग ती भाषेच्या संदर्भात असो की जागेच्या.