मुंबई : संजय राऊत हे सतत भाजपवर टीका करत असतात. त्यामुळे अनेकवेळा भाजप विरुद्ध संजय राऊत अशी खडाजंगी पाहायला मिळत असते. ईडीने महाराष्ट्रात महाविकास आघडीतील नेत्यांवर कारवाईचा सपाटाच लावलेला दिसत आहे. तसेच महाविकास आघडीकडून भाजप सूडबुद्धीने राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. ही कारवाई कायदेशीर आहे, यात भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
ईडी कारवाई करून संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आणि भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी एकत्र दिसले आहेत.
शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी आणि संजय राऊत उपस्थित होते. त्यामुळे ईडी कारवाई वर काय चर्चा झाली? अशा चर्चांना उधाण येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजन निमंत्रण दिले होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत आणि नितीन गडकरी यांनीही हजेरी लावली होती.
या स्नेहभोजनावेळचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत संजय राऊत हे शरद पवारांच्या उजव्या बाजुला बसलेले दिसत आहेत, मध्ये शरद पवार बसलेले आहेत, तर डाव्या बाजुला नितीन गडकरी बसलेले आहे.
त्यामुळे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली का? मात्र याबाबत कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत