पुणे, दि. 9 – पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांचे (झुनोटिक रोग) वाढते प्रमाण लक्षात घेता, हे आजार टाळणे व त्यांचे वेळीच निदान व उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेच्याबाबतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशिअलिटी) पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिनद्र प्रताप सिंग, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
भरणे म्हणाले, पशुधन विषयक सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास 47 खासगी पाळीव प्राणी दवाखाने व सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध असून या मार्फत पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात. मात्र त्यांचेकडून आकारले जाणारे शुल्क सर्वसामान्य पशुपालकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या दवाखानाच्या माध्यमातून वाजवी शुल्क आकारुन आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यावेळी या दवाखान्यासाठी पुणे महापालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते तीन कोटी रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रास्तविकामध्ये पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याची माहिती दिली.