मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात १५३ अ कलमा अतंर्गत अखेर गुन्हा दाखल झाला आहे. उद्या या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह नाव माहिती नसलेल्या शिवसैनिकांविरोधात खार पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. ठाकरे आणि राऊत यांनी शिवसैनिकांना चिथवलं असून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी रुग्णवाहिका आणली होती, असंही राणा दाम्पत्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
राणा दाम्पत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणारं कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामिनपात्र गुन्हा आहे. या कलमांतर्गत जामीन देण्याचा अधिकार हा कोर्टाला आहे. त्यामुळं उद्या राणा दाम्पत्याला कोर्टात हजर करण्यात येईल त्यानंतर त्यांच्या सुटकेबाबत निर्णय होईल. राणांवर जुलमी पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार कारवाई करतेय. राणा दाम्पत्याच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
राणा यांना पोलीस घेऊन गेल्यानंतर युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाईं सह उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मुंबई आपल्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशा स्वरुपाच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, राऊत आणि परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या राणा यांच्या मागणीला पळकुट्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचे म्हटले आहे.


