पुणे, दि. 25 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संगणक टायपिंग व मॅन्युअल टायपिंग परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही व बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा कार्यान्वित असलीच पाहिजे, अशी मागणी टायपिंग प्रशिक्षण संस्थांकडून होऊ लागली आहे.
परीक्षा परिषदेच्या वतीने वर्षातून दोनवेळा संगणक व मॅन्युअल टायपिंग, लघुलेखनच्या परीक्षा विविध केंद्रांवर होतात. या परीक्षा केंद्रांची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात येते. या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शक रितीने व्हाव्यात यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही व बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था असण्याचे बंधन पूर्वी ठेवण्यात आले होते. या व्यवस्थेचा समावेश करूनच प्रति विद्यार्थी परीक्षा खर्च संबंधीत खासगी कंपनीला अदा करण्याबाबतचे सूत्र निश्चित केले होते.
मात्र मागील काही वर्षांपासून परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, बायोमेट्रिक व्यवस्था कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली आहे. यंत्रणा नसताना कंपनीला प्रति विद्यार्थी परीक्षा खर्च अधिकचा दिला जातो. कोणतीही यंत्रणा नसल्याने डमी उमेदवार परीक्षेला बसण्याची धोका संभवतो. परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्यास त्याची वस्तुस्थितीनिहाय माहिती मिळणेही मुश्किल होऊ शकते. यामुळे परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खास यंत्रणा असलीच पाहिजे.



