पुणे : हनुमान चालिसावरुन राज्यभर जोरदार राजकारण रंगलं आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली असून किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर स्पष्ट मत मांडलं आहे.
एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं असं शरद पवार म्हणाले


