कोल्हापूर : राज्यातील आघाडी सरकार जून महिन्यात राजकीय वादळ येऊन कोसळेल, असे भविष्य केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नुकतेच भविष्य वर्तवले होते. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडण्याचा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे. वर्षभरात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
याआधीही अनेक वेळा चंद्रकांत पाटलांनी सरकार पडण्याचे मुहूर्त जाहीर केले होते. परंतु, ते सगळे फोल ठरले होते. पाटील यांच्यासोबत नारायण राणे आणि इतर भाजप नेतेही सातत्याने सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करीत असतात. प्रत्यक्षात मात्र, काहीच घडताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी सरकार पडण्याचे भविष्य वर्तवलं आहे. एवढ्यावरच न थांबता देवेंद्र फडणवीस हे वर्षभरात पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असेही छातीठोकपणे सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी हे भाकीत केलं आहे.
नुकतेच नारायण राणे हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, शिवसेनेला प्रशासन चालवता येत नाही. मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा शिवसेनेचा आवाका नाही. अडीच वर्षांत मुख्यमंत्री फक्त एकदा मंत्रालयात येतात. दोन तासांत फाईल निकाली काढल्याचे सांगतात यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव तोकडा आहे.



