नवी दिल्ली : हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून सोनिया गांधी यांना पत्रही पाठवले आहे. यात हार्दिक पटेल यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. तर दुसरीकडे CAA- NRC, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवणे यावरुन मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना हार्दिक पटेल यांनी राजीनामा देणं हा काँग्रेससाठी धक्का मानला जातोय. हार्दिक पटेल यांनीही पत्रात काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आणि पदाचा आर्थिक लाभ घेतला. मी जेव्हा गुजरातच्या हितासाठी भूमिका घेतली त्यावेळी पक्षाने माझा विरोध केला, असा आरोप त्यांनी केला आहे.
हार्दिक पटेल यांच्या पत्रातील तीन महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया….
विरोधाचं राजकारण २१ व्या शतकात भारत हा तरुणांचा देश आहे. या देशाला सक्षम आणि भक्कम नेतृत्व अपेक्षित आहे. मात्र, गेल्या ३ वर्षात काँग्रेस पक्ष फक्त विरोधाचं राजकारण करत असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात केलाय. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न, CAA- NRC चा मुद्दा, जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि जीएसटीची अंमलबजावणी अशा विविध मुद्द्यावर देशातील जनतेला तोडगा हवा होता. मात्र, काँग्रेसची भूमिका केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध करण्यापर्यंत मर्यादित राहिली.
पक्षाने केंद्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत अडथळे आणले. देशातील सर्वच राज्यातील जनता काँग्रेसला नाकारत असून काँग्रेस पक्ष आणि नेतृत्व तरुणांसमोर साधा आराखडाही सादर करु शकलेले नाही, असंही त्यांनी म्हटलंय. वरिष्ठ नेत्यांचं लक्ष मोबाईलकडेच!हार्दिक पटेल यांनी पत्रात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. हार्दिक म्हणतात, मी जेव्हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्यावेळी गुजरातमधील जनता आणि पक्षातील नेत्यांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नेत्यांचं लक्ष स्वत:च्या मोबाईलकडे होते. जेव्हा देश संकटात होता, त्यावेळी काँग्रेसचे नेते परदेशात होते. गुजराती जनतेबाबत पक्ष नेतृत्वाच्या मनात द्वेष भावना असल्याचे वाटते. अशा परिस्थितीत गुजराती मतदार काँग्रेसकडे पर्याय म्हणून बघतील का, असा प्रश्नही पटेल यांनी उपस्थित केला आहे.
चिकन सँडविच हार्दिक पटेल यांनी पत्रात पक्ष नेत्यांच्या चिकन सँडविचचा उल्लेखही केलाय. ‘एकीकडे आमच्यासारखे कार्यकर्ते स्वखर्चाने ५००-६०० किलोमीटरचा प्रवास करुन जनतेला भेटतात. दुसरीकडे काँग्रेसचे बडे नेते दिल्लीतून आलेल्या नेत्यांना चिकन सँडविच वेळेवर दिलं की नाही यातच व्यग्र असतात. मी जेव्हा तरुणांना भेटतो, ते म्हणतात तुम्ही अशा पक्षासाठी काम करताय ज्यांनी दरवेळी फक्त गुजराती समाजाचा अपमान केलाय. मला वाटतं गुजरात काँग्रेसने तरुणांचा अपेक्षाभंग केलाय’, असे हार्दिक पटेल यांनी म्हटलंय.