कोल्हापूर, 4 जून : राज्यसभेच्या निमित्ताने कोल्हापूरचे दोन उमेदवार सहाव्या जागेसाठी मैदानात उतरले आहेत. याच सहाव्या जागेवरून ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे साहजिकच कोल्हापूरचे दोन पाटील पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. उमेदवारांऐवजी सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सामना होणार आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर मधील पोट निवडणुकीत बंटी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना धूळ चारली होती आता पुन्हा एकदा मैदान रंगणार आहे.
राज्यसभेचे कुस्ती मैदान मुंबईत भरले असले तरी ज्या सहाव्या जागेची प्रतिष्ठेची कुस्ती आहे त्यामध्ये कोल्हापूरच्या दोन राजकीय पैलवान उतरले आहेत. या कुस्तीमुळे कोल्हापूरच्या राजकारणातही वातावरण चांगलंच तापले आहे. महाविकास आघाडीने संजय पवार तर भाजपने धनंजय महाडिक यांना मैदानात उतरले आहे. हे दोघेही विजयाचा दावा करत आहेत.
या दोघा पैलवानांनी विजयाचा दावा केला असला तरी त्यांच्या वस्तादांनीही हे पैलवान विजयी व्हावे यासाठी आता आकडेमोड करायला सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे वस्ताद असलेले चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांना कोणत्याही स्थितीत यावेळी गुलाल लावायचाच हा चंग बांधला आहे. चंद्रकांत पाटलांना भाजप वाढवायला महाडिक कुटुंबाने मदत केली. मात्र त्या तुलनेत महाडिक कुटुंबाला भाजपकडून बळ मिळाले नाही.
उलट सतेज पाटील यांच्या विरोधातील विधान परिषद निवडणुकीला अमल महाडिक यांना माघार घ्यायला लागली आणि राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या सतेज पाटलांना बाय देण्याची वेळ महाडिकांवर आली. त्यामुळे महाडिक गट बॅकफूटला गेला. राज्यसभेच्या निवडणुकीतही महाडिकांवर माघार घेण्याची वेळ येते की काय अशी स्थिती होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचाच उमेदवार माघार घेण्याची विनंती भाजपने करत लढण्याची तयारी दाखवली. त्यामुळे धनंजय महाडिक आता रिंगणात असून त्यांच्या विजयाचे दावे भाजपचे नेते करत आहेत.