पुणे : राज्यात गेल्यावर्षी सर्वाना उत्तीर्ण करण्याचे धोरण बाळगून जाहीर झालेल्या बारावीच्या शंभर टक्के निकालानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या वाढवून दिलेल्या जागा यंदा कशा भरायच्या हा महाविद्यालयांसमोरील प्रश्न यंदाच्या बारावीच्या निकालाने सोडवल्याचे दिसत आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला. यात कोकण विभागाने पहिला क्रमांक व नागपूर विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी निकाल जाहीर केला. मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र या धर्तीवर परीक्षेचे नियोजन करून परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली होती.
यंदा परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा परीक्षा न दिलेल्या साधारण ९३ हजार विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळणार असून यातील बहुतेक विद्यार्थी यंदा पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे गेल्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी महाविद्यालयांना वाढवून दिलेल्या जागा यंदाही भरणार असल्याचे दिसते आहे.



