मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची एक कथीत ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. शहाजीबापूंचा कार्यकर्त्यासोबत झालेला हा संवाद मजेशीर आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना म्हटले, “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा शब्द धरून नेटकऱ्यांनी देखील काही मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे.
‘आमचं सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार’, असे गुपित सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी फोडले आहे. त्यांची ही क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पाटील यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन करून आपण कुठे आहात, अशी विचारणा केली असता शहाजी पाटील म्हणाले की, मी गुवाहाटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करू नका, असा नेत्यांचा आदेश होता. त्यामुळे कुणाला फोन केला नाही, असे त्यांनी कार्यकर्त्याला समजावून सांगितले.



