सोलापूर : राज्याच्या राजकारणात सत्ताकलह सुरू असून, पक्षाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यामूळे महाविकास आघाडीचे सरकार राहील की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांनी आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पण, निवडणूक स्वबळावर लढल्यास महापालिका व जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची, याचा तर्कवितर्क लढविला जात आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वच जागांवर (प्रभाग) उमेदवार उभा करता आलेले नाहीत. युती आणि आघाडीमुळे शिवसेना व राष्ट्रवादीवर तशी वेळ आली नाही. पण, आतापर्यंत काहीवेळा काँग्रेस आणि भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाल्यास सर्वच पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. भविष्याचा वेध घेऊन तिन्ही पक्षांनी आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे.
आघाडी होऊ द्या अथवा नाही, तरीदेखील महापालिकेवर आमचीच सत्ता असेल, असा विश्वास काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. तर आतापेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील, असा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत. राष्ट्रवादीला मात्र महाविकास आघाडीची गरज वाटत आहे. दुसरीकडे भाजपने, आम्ही विकासकामांच्या बळावर पुन्हा एकदा सत्तेवर येऊ, असा दावा केला आहे.



