मुंबई : शिवसेनेचे एकनाथ शिंदेंनी बंड का केलं? कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे असं करु शकतात? यावर आजही अनेकांना विश्वास बसत नाही. गल्लोगल्ली, नाक्यानाक्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि शिवसेनेवर ओढवलेल्या संकटाची चर्चा रंगली आहे. या सगळ्या घडामोडींमागे भाजपाच आहे, असा थेट आरोप शिवसेनेनं केलेलाय. तर दुसरीकडे ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन कशाप्रकारे भाजप काम करतंय, यावरुनही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा निशाणा साधला.
त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे ईडी हेच सगळ्यात मोठं कारणं असल्याची शंका व्यक्त केली जाते आहे. एकनाथ शिंदे नव्हे तर त्यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या एका व्यक्तीला ईडीने नोटीस पाठवली होती, अशा आशयाची एक पेपर कटींग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहेत. त्यामुळे सचिन जोशी कोण आणि कुठे आहे याचीही चर्चा आहे.
व्हायरल झालेल्या या पेपर कंटींगची चर्चांना उधाण आलं. नवल म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या जवळची असणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सचिन जोशी असल्याचं सांगितलं जातं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता सचिन जोशी कुठे आहेत? सचिन जोशी यांचा शिंदेंच्या बंडासोबत नेमकं कनेक्शन काय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
सचिन जोशी हे मूळचे ठाण्यामधीलच. ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार हे सचिन जोशी हाताळत होते, असं सांगितलं जातं. पण अधिकृतपणे त्यावर अद्याप कुणीच वाच्यता केलेली नाही. सचिन जोशींसह ठाण्यात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाकडून शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळले जातात, असं बोललं जातं.
हम्स लाईव्ह न्यूजच्या रिटा कुरीयन यांनी 24 जून रोजी दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदेंच्या आर्थिक व्यवहारांचे सेक्रेटरी म्हणून सचिन जोशी यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांना दहा दिवसांपूर्वी ईडीनं नोटीस पाठवली होती. तेव्हापासून सचिन जोशी हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. आता नेमके सचिन जोशी कुठे आहेत, त्यानंतर राज्यात झालेले सत्ता संघर्ष यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.



