मुंबई : अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडण्याचे प्रयत्न करत होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. भाजप नेते या क्षणाची वाट पाहत होते. अखेरीस या राजीनाम्यानंतर आनंद गगनात मावेना अशी अवस्था भाजप नेत्यांची झाली आहे. भाजपकडून या क्षणाचा जल्लोष साजरा केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढे भरवताना व्हिडिओत दिसत आहे. भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत आहेत. फडणवीस यांचा शपथविधी एक दोन दिवसांत होईल, तो अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रात विकासपर्व सुरु होणार असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. नवं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोकणाचा, सिंधुदुर्गचा आणि महाराष्ट्राचा विकास करतील असेही राणे म्हणाले.



