मुंबई : राज्यात २०१९ साली भाजपला विरोध करत विरोधी विचारांच्या पक्षासोबत सरकार स्थापन करणं शिवसेनेला परवडणारं नव्हतं हे उघड होतं. भाजपने आपल्या विरोधकाला आणि जे प्रगतीत अडथळे ठरतात त्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारलंय हा इतिहास आहे. महाराष्ट्रात अशी उध्वस्त झालेली अनेक उदाहरणं आहेत. केंद्रातील सत्तेचा उपयोग करून भाजपने आपले डाव देशातील बऱ्याच राज्यात रंगवल्याचंही पहायला मिळालं. आपल्याला आव्हान देणारा पक्षच संपवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जातो हे स्पष्ट आहे. भाजपच्या हिंदुत्वाचा भागीदार दुसरा कुठला पक्ष होऊ नये आणि आपल्याला आव्हान देणारा पक्षच उदयास येऊ नये हा भाजपचा अजेंडा उघडपणे दिसून येतो. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे राज ठाकरे.
राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या प्रश्नावर भाजपने त्यांना महाराष्ट्रात पाठिंबा दिला पण जेव्हा त्यांना आयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह या भाजप खासदारांनी विरोध केला. तेव्हा भाजपने सिंह यांना विरोध केला नाही. यावरून भाजपची भूमिका सहज लक्षात येऊ शकते. याच कारणामुळे शिवसेनेला संपवण्याचा आणि त्यांचे आव्हान मोडून काढण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणावा लागेल. महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार पाडण्याचा अडीच वर्षापासून भाजपकडून प्रयत्न केला जात होता. याचे पडसाद राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसून आले अन् शेवटी भाजपने डाव जिंकला. भाजपने शिवसेनेच्या मतदाराला आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी त्यांनी शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली पण सत्तेची ‘वेसन’ भाजपने स्वतः कडे ठेवली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री राजीनामा देतो असं बोलले तेव्हा वाईट वाटलं खूप. त्यांचे काही शब्द खूप लागले मनाला. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शेवटचा संवाद कायम लक्षात राहील पण सत्तेसाठी आपल्या विचारांशी केलेली लाचारी तुम्हाला परत कधीतरी तुमची जागा दाखवून देते तेच ठाकरेंसोबत घडलं. पण सत्तेसाठी भाजप कोणत्या पातळीवर गेलं हेही महाराष्ट्राने बघितलं. सत्ता आणि पैसा असला की सत्ताच काय, जगही बदलता येऊ शकतं हे सर्व जगाने पाहिलंय.
हा शिवसेनेसाठी आयुष्यातील सर्वांत मोठा धडा असेल. परत शिवसेना तेवढ्या आवेगाने आणि त्वेषाने उभारी घेईल का? हा प्रश्न निर्माण होतो. 2019 ला शरद पवारांनी महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री दिला अन् 2022 ला पुन्हा बंडखोर शिवसेनेला मुख्यमंत्री दिला तो फडणवीसांनी. त्यात सेना पूर्णत: होरपळलीय अन् फडणवीसांनी बहुमत असताना सेनेला मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेच्या हिंदुत्वालाच हात घातलाय. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.



