मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रावर राजकीय अस्थिरतेचे ढग जमले आहेत. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवरील संकट अधिक गडद झालं आहे. उद्या 30 जून रोजी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. ही प्रक्रिया उद्या संध्याकाळी 5 वाजपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शिवसेना कोर्टात गेला आहे.
त्यामुळे ठाकरे सरकारच्या बाजूने निर्णय येतो की उद्या आघाडीला बहुमत सिद्ध करावे लागते हे पाहावं लागणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती चांगली नाही. शिवसेनेच्या 39 आमदारांनी आघाडीतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. तर सात अपक्ष आमदारांनी पत्रं लिहून सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं आहे, अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.
दुसरीकडे शिवसेनेने 16 आमदारांना अपात्रं ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाने तांत्रिक कारणं पुढे देत शिवसेनेची कृती चुकीची आहे असं म्हटलं असलं तरी बंडखोरांसाठी वाटतो तितका मार्ग सोपा राहिलेला नाही. हे प्रकरण कोर्टात असल्याने कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहेत. म्हणजे शिंदे गटाकडे दोन तृतियांश मते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करून हे लोक भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



