मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच ठरला. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले.
आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अगदी कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री कंगना रणौत हिने आपल्या खास शैलीत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
२०२० मध्ये मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे ठरवले., त्यामध्ये कंगनाचे मुंबई येथील ऑफिसचा काही भागही पाडण्यात आला. यावेळी कंगनाने शिवसेनेवर सडकून टीका केली होती. पण भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाचा सूर काहीसा बदलताना दिसला. तिने चक्क एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.



