मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. या बंडाने ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांनाही नव्हती. मात्र फडणवीसांनी याठिकाणीही सर्वांना धक्का देत एकनाथ शिंदे यांचं नावं हे थेट मुख्यमंत्रिपदासाठी घोषित केलं. या नव्या सरकारचा शपथविधी गुरूवारीच पार पडला.
या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आज मोतश्रीवरही एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील खासदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला दोन खासदारांची अनुपस्थितीही होती. खासदार श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी या बैठकीत कुठेच दिसल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाच्या जाण्याने आणखी काही नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता भासत आहे. ते रोखण्याचा प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू आहे.
या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवल्याचेही पत्र समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध कारवाया केल्या त्यामुळे तुम्ही स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले, असेही या पत्रात म्हटले आहे.



