मुंबई : भाजपाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांसह सत्तास्थापन केली. यानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्याची घोषणा झाली आणि देवेंद्र फडणवी यांना केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. “चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद मिळेल का नाही हेच अद्याप सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी बाकडं वाजवू नये,” असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. ते रविवारी (३ जुलै) विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे. भाजपाचे १०५ आमदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून विचारा की जे घडलंय त्याने आपलं समाधान झालं आहे का? चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे? सगळ्यांना वाटतंय मिळेन. काय होईल काही सांगता येत नाही.”



