मुंबई : कधीकाळी विरोधी पक्षातील नेत्याच्याही विधानसभा अध्यक्षपदी निवड केली जात होती. पण आता बदलत्या राजकीय परस्थितीनुसार ही निवड देखील प्रतिष्ठेची होऊ लागली आहे. सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर याचा अनुभव सर्व महाराष्ट्राला आला आहे. असे असतानाही रविवारी झालेल्या निवडीच्या दरम्यान 12 आमदारांची अनुपस्थिती होती.
यामध्ये सर्वाधिक संख्या ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आमदारांची आहे. तर भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक ह्या आजारी असल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत. तर शिंदे गटाचे आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांनी या अध्यक्षपदाच्या निवडीला हजेरी लावली होती. अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. निवडीचे चित्र स्पष्ट असल्याने अनेकजण अनुपस्थित राहूनही त्याचा फारसा परिणाम निकालावर झालेला नाही.
अनुपस्थितमध्ये 12 पैकी 7 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या दरम्यान जवळपास डझनभर आमदार हे उपस्थितच राहिले नाही. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजारी किंवा परदेशात असणाऱ्या आमदारांनीही हजेरी लावली होती पण अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान 12 आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. यामध्ये सर्वाधिक 7 आमदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. यामध्ये नवाब मलिक, अनिल देशमुख, दत्ता भरणे, निलेश लंके, संजय बनसोडे, दिलीप मोहिते, बबन शिंदे यांचा समावेश होता तर भाजपाच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे व रणजित कांबळे हे अनुपस्थित होते. तर एमआयएमचे मुफ्ती इस्माइल शाह हे देखील उपस्थित राहू शकले नव्हते.




