पवनानगर (वार्ताहर) – शिवली येथील शिक्षकांनी मानवी साखळी करुन विद्यार्थ्यांना पुरातुन बाहेर काढले.पवना मावळ परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे नदी,आढे व नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थीती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.जरी संततधार पाऊस सुरु असला तरी परिसरात माध्यमिक व प्राथमिक शाळा सुरुच असुन विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत आहेत.परंतु काल नेहमीप्रमाणे शिवली येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय दिवसभर सुरु होते.या शाळेत परिसरातील येलघोल, धनगव्हाण, भडवली,आर्डव ,येळसे, कोथुर्णे, काटेवाडी, खडकवाडी व येवलेवाडी या परिसरातील विद्यार्थी येत असतात परंतु दमदार झालेल्या पावसामुळे शिवली भडवली रस्त्यावरील पुलावरून पाणी गेले आणि शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घराकडे जाण्यासाठी निघाले परंतु विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रवाहातून पलीकडे जाता येत नव्हते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव व सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व शिक्षक यांची मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांना त्या पाण्यातुन वाट करुन दिली त्यामुळे विद्यार्थी सहज घराकडे जाऊ शकले या शाळेतील मानवी साखळी करुन विद्यार्थ्यांना सुखरुप ओढा पार करुन दिल्याने शिक्षकांचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
शिवली भडवली या ओढ्यावरील पूलाची उंची कमी असल्याने जोरदार पाऊस झाला का अनेकदा हा पूल पाण्याखाली जातो.त्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत,शाळा व्यवस्थापन व लोकप्रतिनिधी यांनी या पुलाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सुजाण नागरिक व पालक करत आहेत.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव म्हणाले की, आमची शाळा शिवली व भडवली गावातून बाहेर आहे या शाळेच्या ठराविक अंतरावर हा ओढा आहे या ओढ्यावरील पूलाची उंची कमी असल्याने जोरदार पाऊस झाला का अनेकदा हा पूल पाण्याखाली जातो त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते




