मुंबई- लढाईसाठी तयार राहा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मातोश्रीवर बोलावलेल्या जिल्हाप्रमुख आणि पदाधिका-यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. नगरपरिषद, नगरपालिका निवडणूक तयारीसाठी बोलवलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी कुणी गेले आहे, याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या´ असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.
तसेच आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तळागाळात जावून लोकांची कामे करा. मुंबईत ज्याप्रमाणे पक्ष काम करतोय,त्याप्रमाणे राज्यातही कामे करा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काहीशी बॅकफूटवर गेलेली शिवसेना नगरपालिकांच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका शिवसेनेसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे.
आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर होणार…
नगरपालिका निवडणुकांसाठी आघाडी करण्याचे निर्णय हे स्थानिक पातळीवर घ्या, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र नगरपालिका निवडणुकांना सामोरे जाण्याच्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाल्याचे मानण्यात येते आहे. शिवसेनेला सोबत घेऊन पुढील विधानसभा निवडणुका लढवाव्यात, अशी शरद पवार यांची इच्छा दिसते आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीत याचे संकेत दिले आहेत. त्यापूर्वी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबईप्रमाणेच राज्यातही संघटना बळकटीचे लक्ष्य…
मुंबईत ज्याप्रमाणे शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे सूत्र ज्या प्रकाराने शिवसेना मुंबईत वापरते. त्याचाच फायदा त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत होतो. असेच पक्षाचे संघटन तळागाळात आणि गावागावात करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिवसेना मजबूत आहे, हे दाखवून द्या…
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, शिवसेना पक्ष कमकुवत झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुणी गेले आहे, याचा विचार न करता शिवसेना मजबूत आहे, हे या निवडणुकांत दाखवून द्या, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.



